Ad will apear here
Next
‘हम तेरे प्यार में...’
एक ऑगस्ट हा अभिनेत्री मीनाकुमारी हिचा जन्मदिवस. त्या निमित्ताने, तिच्यावर चित्रित झालेल्या आणि तिच्या अप्रतिम अभिनयाचा दाखला असलेल्या ‘हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे है’ या गीताचा रसास्वाद... आजच्या ‘सुनहरे गीत’मध्ये....
.............
‘तुम क्या करोगे सुनकर मुझसे मेरी कहानी?’ हा प्रश्न ‘तिने’ तिच्या शायरीमधून विचारला होता. तरीही ‘ती’ गेल्यानंतर आज ४०-४५ वर्षांनंतरही ‘तिच्या’ बेलुत्फ (नीरस) जिंदगीचे फिके फिके किस्से मनात आठवणींचा पिंगा घालू लागतात. एक ऑगस्ट १९३२ ही तिची जन्मतारीख! अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारीचा तो जन्मदिवस! मीनाकुमारी कोण होती हा प्रश्न चित्रपटप्रेमी विचारणार नाहीत. कारण तिने बैजू बावरा, परिणिता, शारदा, दिल अपना और प्रीत पराई, पाकिजा यांसारख्या अनेक चित्रपटांतून साकार केलेली अभिनयाची लेणी हे हिंदी चित्रपटांचे सुवर्णपान आहे.

‘बच्चों का खेल’ या चित्रपटात ती बालकलाकार म्हणून प्रथम पडद्यावर आली. घरातील अत्यंत गरीब परिस्थितीमुळे तिच्या आई-वडिलांनी तिला चित्रपटात काम करायला लावून उत्पन्नाचे साधन बनवले. त्यांच्या त्या कृतीने हिंदी चित्रपटसृष्टीला भविष्यकाळात एक अभिनयसम्राज्ञी मिळाली; पण तिच्या भावनांचा कोंडमारा, आकांक्षांवर पडणारे पाणी, याचा विचार झाला नाही. तिचे स्वातंत्र्यच तिच्यापासून हिरावून घेतले गेले. बालवयातून तारुण्यात पदार्पण केल्यावरही कॅमेरा, स्टार्ट, अॅक्शन या शब्दांतून सुटका न होता तेच तिचे जीवन बनले. कारण ती अप्रतिम सुंदर नसली, तरी सुंदर होती आणि त्यापेक्षा जास्त तिचे अभिनयातील नैपुण्य होते. आपल्या भावनांचा कोंडमारा होतो, म्हणून तिने विवाहाचा मार्ग निवडला; पण त्यामुळेही फारसे सुख तिच्या वाट्याला आले नाही. तिच्या वैयक्तिक जीवनातील घटनांमुळे पडद्यावर ‘ट्रॅजेडी क्विन’ म्हणून ती लोकप्रिय झाली कारण ‘बैजू बावरा’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘दिल एक मंदिर’, ‘प्यार का सागर’, ‘पाकिजा’ यांसारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिका दु:खमग्न प्रेयसीच्या होत्या!

मीनाकुमारी जे जगली तेच तिने पडद्यावर साकार केले, असे म्हणणे म्हणजे तिच्यामधील अभिनेत्रीवर अन्याय करण्यासारखे आहे. ट्रॅजेडी क्वीन किंवा सोज्वळ नायिका अशी मीनाकुमारीची एक इमेज निर्माण झाली होती. त्याच्या विरुद्ध टोकाची भूमिका ‘चित्रलेखा’ या चित्रपटात तिला मिळाली. या चित्रपटातील भूमिका मीनाकुमारीच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारी नव्हती; पण कोणत्याही भूमिकेत स्वत:ला शोधण्याच्या प्रवृत्तीमुळे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत असलेली ही भूमिकाही जीव तोडून करण्याचा प्रयत्न मीनाकुमारीने केला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शर्मा तर तिच्या त्या भूमिकेवर इतके खूष झाले होते की बस! 

कोणत्याही चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी एखाद्या कलावंताने चांगला ‘शॉट’ दिला, तर त्या कलावंतावर खूष होऊन त्याला ‘दोन आणे’ बक्षीस देण्याचा केदार शर्मांचा परिपाठ होता. काही वर्षांपूर्वी शर्माजींची ही बक्षिसी चित्रपट व्यवसायात इतकी मशहूर होती की, अनेक कलावंत शर्माजींकडून ही बक्षिसी मिळवण्यासाठी धडपडत असत. यामध्ये मधुबाला, गीता बाली, राज कपूर, नर्गिस, दिलीपकुमार अशा बिनीच्या कलावंतांचा समावेश असे. कोणत्याही कलावंताने कितीही चांगला अभिनय केला तरी शर्माजींची बक्षिसी त्याला दोन आण्यांपेक्षा जास्त मिळाली नव्हती; पण ‘चित्रलेखा’तला मीनाकुमारीचा एका प्रसंगातला अभिनय बघून केदार शर्मा एवढे खूष झाले, की त्यांनी तिला १०१ रुपये बक्षीस दिले. मीनाकुमारीच्या अभिनयाच्या अशा अनेक हकीकती आहेत. तिच्या नुकत्याच होऊन गेलेल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण तिच्या एका गाण्याचा रसास्वाद घेऊ या. हे गीत म्हणजे -

और तुम कहते हो की ऐसे प्यार को भूल जाओ, भूल जाओ 

(हे प्रिया) तुझ्या प्रेमापायी मी हे सारे जग (आलम) सोडून दिले आणि तुला प्राप्त केले आणि आता तूच सांगत आहेस, की हे असे प्रेम मी विसरून जावे? (अरे, हे तुला म्हणवते तरी कसे?) 

पंछीसे छुडाकर उसका घर, तुम अपने घरपर ले आए
ये प्यार का पिंजडा मन भाया, हम जी जी भरकर मुस्काए
जब प्यार हुआ इस पिंजडेसे, तुम कहने लगे आजाद रहो 
हम कैसे भुलाए प्यार तेरा, तुम अपनी जुबाँसे ये न कहो
अब तुमसा जहाँ में कोई नहीं, है हम तो तुम्हारे हो बैठे है
 
मी म्हणजे स्वच्छंदीपणे जगणारे एक पाखरू होते आणि अशा मला या पाखराला, तुम्ही त्याच्या घरापासून विभक्त करून आपल्या घरात आणले, संसारात आणले. (मला पण तुमच्या समवेतचे प्रेममय जीवन अर्थात) हा प्रेमाचा पिंजरा मनापासून आवडला. (तुमच्या प्रेमाचे मधुर बंधन आवडले) आणि मी या पिंजऱ्यात आनंदाने राहिले. (आमचे हृदय या पिंजर्यात आनंदाने भरून आले) आणि अशा तऱ्हेने तुमच्या (प्रेमरूपी) पिंजऱ्यावर माझे प्रेम जडले, तेव्हा तुम्ही सांगू लागलात, की स्वतंत्र व्हा! (हे काय योग्य आहे का?) मी तुमचे प्रेम कसे विसरू शकते? तुम्ही स्वत:च्या तोंडाने याबद्दल सांगू नका! या जगात माझे तुमच्याशिवाय दुसरे कोणी नाही, मी तुमचीच झाले आहे व तुम्ही सांगता, की ‘या प्रेमाला विसरून जा!’

इक तेरी चरण की धूलसे हमने अपनी जीवन माँग भरी 
जब ही तो सुहागन कहलायी, दुनिया के नजर में प्यार भरी 
तुम प्यार की सुंदर मूरत हो, और प्यार हमारी पूजा है
अब इन चरणों में दम निकले, बस इतनी और तमन्ना है
हम प्यार की, गंगाजल से बलमजी तनमन अपना धो बैठे 

या तुझ्या पदस्पर्शाने पावन झालेली मृत्तिका मी माझ्या भांगात भरली व त्यामुळेच या जगाच्या नजरेत मी तुझी सौभाग्यवती म्हणून ओळखली जाऊ लागले. माझ्या प्रेमाची सुंदर मूर्ती म्हणजे तुम्ही आहात. तुमच्यावरील माझे प्रेम म्हणजे एक पूजाकर्म आहे. आता यापुढे तुमच्या पायाशी असतानाच माझे प्राण जावेत, फक्त एवढीच अपेक्षा आहे. तुमच्या गंगेसारख्या पवित्र जलरूपी प्रेमात मी माझे तनमन धुतले आहे. मी त्यात पूर्णपणे भिजले आहे आणि आता तुम्ही सांगता, की तुमच्या या अशा प्रेमाच्या विश्वाला मी विसरून जावे? (कसे शक्य आहे ते?) 

एका सर्वस्व अर्पून प्रेम करणाऱ्या प्रेमिकेच्या भावना गीतकार हसरत जयपुरी यांनी उपमा अलंकार वापरून या गीतात इतक्या समर्पक शब्दात उतरवल्या आहेत, की हे गीत ऐकताना, पाहताना एका स्त्री मनाची ही विनवणी एका पुरुषाने लिहिली आहे हे खरेच वाटत नाही. 

सामान्यपणे हिंदी चित्रपटगीताचे कडवे दोन ओळींचे असते; पण येथे ते चार-पाच ओळींचे आहे; पण तरीही संगीतकार शंकर जयकिशन यांनी ते सुंदर चालीत गुंफून उत्कृष्ट वाद्यमेळाच्या आधारे हे गीत सुमधुर बनवले आहे. १९६२ सालच्या ‘दिल एक मंदिर’ चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले हे गीत चित्रपटातील एका भावपूर्ण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर आपल्यापुढे येते. कॅन्सर झालेला पती आपल्या पत्नीला सांगतो, की ‘मी आता जगणार नाही. तेव्हा तू दुसरा विवाह करून सुखी हो!’ यावर ती पत्नी या गीतातून त्याला उत्तर देऊन आपली मन:स्थिती सांगते. कथेच्या अनुषंगाने अर्थपूर्ण गीते कशी शोभून दिसतात व चित्रपट प्रभावी करतात त्याचे हे उत्तम उदाहरण! 

चित्रपटगीते पडद्यावर चित्रित करताना दिग्दर्शकाचेही तेवढेच कौशल्य आवश्यक असते. येथे दिग्दर्शक श्रीधर यांनी केलेली छान कलाकुसर आणि मीनाकुमारीचा अप्रतिम अभिनय या दोन्ही गोष्टींबद्दल काही सांगण्यापेक्षा तुम्ही हे गीत पाहा आणि ऐका म्हणजे लक्षात येईल, की ‘सुनहरे गीत’ ही काय चीज असते...!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZUTBF
Similar Posts
तेरे बिना जिंदगी से कोई ‘अष्टपैलू’ हे विशेषणही कमी पडेल, इतके पैलू असलेला अभिनेता संजीव कुमार याचा सहा नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्त ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्याच्यावर चित्रित झालेले ‘तेरे बिना जिंदगी से कोई...’ हे गीत...
तुम ही मेरे मंदिर... गीतकार राजेंद्रकृष्ण यांचा २३ सप्टेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी लिहिलेले ‘तुम ही मेरे मंदिर, तुम ही मेरी पूजा’ हे गीत...
दिल पुकारे आ, रे, आ, रे....! एक ऑक्टोबर हा संगीतकार एस. डी. बर्मन आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या या जोडीचे ‘दिल पुकारे आ, रे, आ, रे....!’ या गीताबद्दल...
आ नीले गगन तले... गीतकार हसरत जयपुरी यांचा आज (१७ सप्टेंबर) स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी लिहिलेले ‘आ नीले गगन तले’ हे गीत...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language